* खंडोबाची देवघरातील - TopicsExpress



          

* खंडोबाची देवघरातील पूजा प्रतीके खंडोबाचा टाक सर्वच कुलदेवतांच्या टाका प्रमाणे खंडोबाचा टाकही पंचकोनी असतो तो चांदीचा असावा व त्यास मागील बाजूस तांब्याची पाठ असावी असा संकेत आहे.खंडोबाचे टाकात खंडोबा व म्हाळसा यांची द्वीभुज अश्वरूढ प्रतिमा असते खंडोबाचे एका हाती खड्ग असते व महालसे च्या हाती त्रिशूल असतो किवा तिचे हात रिक्त असतात. घोड्याचे पाया मध्ये कुत्रा असतो . ज्यांचे कुलदेवत खंडोबा आहे अश्या सर्वांच्या देवघरात खंडोबाचा टाक असतोच. खंडोबाचे मूर्ती खंडोबाचे देवघरातील मूर्ती या धातूंच्या असतात ह्या अश्वारूढ असून कधी द्विभुज तर कधी चतुर्भुज असतात खंडोबा व म्हाळसा स्वार असलेल्या मूर्ती आलिंगन मुद्रेत दिसतात चतुर्भुज मूर्तींच्या हातात खड्ग ,त्रिशूल ,डमरू ,पानपात्र दिसते तर द्विभुज मूर्तींच्या हाती खड्ग दिसते * खंडोबाची देवघरातील इतर पूजा प्रतीके दिवटी बुधली ही धातू पासून बनवलेली असते दिवतेच्या वरील भागात एक पात्र असते त्यात कापडाचा पलीदा लावून त्याचे वर बुदलीने तेल टाकून जाळले जाते खरेतर हे मशालीचेच वेगळे रूप या दिवातीचा उपयोग देवाला ओवाळण्या साठी केला जातो खंडोबाचे कुलाचारात महत्वाचे स्थान असल्याने कुलदेवत खंडोबा असणाऱ्या सर्वच देवघरात दिवटी असते गाठा हा सुताचा अथवा पंचधातूचा किवा चांदीचा गोफ असतो सुताचे दुहेरी पट्टी वर उलट्या कवड्या लावलेल्या असतात गोफचे एका बाजूचा वेढा व दुसरया बाजूच्या गाठी वेढ्यात गुतवून तो गळ्यात घालता येतो. धातूचा गोफ ही दुहेरीच असतो त्यावर धातूच्या कवड्या असतात व एका बाजूस कळस असतो तो कळस वेढ्यात गुतवून तो गळ्यात घातला जातो . गाठा हे एका बंधन आहे खंडोबाशी असलेल्या बांधीलकीचे प्रतिक आहे , वाघ्या मुरुळीची दीक्षा घेताना ते घातले जाते. वाघ्या मुरुळीच्या देवघरात तो असतो. खंडोबाचे उत्सव व कुलाचाराचे प्रसंगी तो गळ्यात धारण केला जातो. ज्या घरामध्ये घरवाघ्याची परंपरा आली असेल अश्या परिवारांचे थोरल्या कुटुंबात तो परंपरेने असतो शिक्का हे गाठ्याचेच प्रतिक रूप आहे धातूच्या पट्टीचे गोलाकार कडे मन्हजेच शिक्का हा पंचधातू अथवा चांदीचा असतो ज्यांना गाठा करणे शक्य नाही किवा देवघरात पुजे साठीच ठेवायचा आहे अश्या परिवारांच्या देवघरात शिक्का वापरला जातो घोळ हे एक लोखंडी कड्याचे बनलेले नाद वाद्य आहे लोखंडाचे तीन अंडाकृती कड्या एका बाजूने मुठीत धरण्यासाठी एकत्र जोडलेल्या असतात व दुसऱ्या बाजूने विभक्त असतात व त्या मध्ये गोल कड्या अडकवलेल्या असतात घोळ मुठीत धरून हलवल्यावर अडकवलेल्या गोल कड्या एकमेकावर आदळून नाद निर्माण होतो हे वाघ्या मुरुळीचे वाद्य आहे कोटंबा हे आयताकृती भिक्षापात्र असते ते लाकडाचे किवा धातूचे असते वाघ्या मुरुळी वारी मागताना यांचा उपयोग करतात. भाविक भक्त कुलाचाराचे वेळेस व वाघ्या मुरुळी वारी मागताना या कोटंब्याची पुजा करून कोटंबा धन धान्याने भरून दान करतात व तुज्या उपसाकाचे पूर्णपात्र आम्ही भरले आहे तू आम्हाला आमचे आयुष्य भरभरून दे हे दान खंडोबाला मागतात भंडारी ही वाघ्या मुरुळी कडील भंडाराची छोटी पिशवी ही कातडीची असते हिला गळ्यात आडकवण्या साठी मोठी दोरी असते भंडारी गळ्यात घातल्या वर टी पिशवी कमरेवर येते वाघ्या मुरुळी यातील भंडार भक्तांना लावतात जुन्याकाळी ही पिशवी वाघ्याचे कातडीची असावी असा संकेत होता लंगर कड्यांची मोठी लोखंडी साखळी म्हणजे लंगर वाघ्या जागरणाचा विधी जाहल्यावर ही साखळी तोडतो याला लंगर तोडणे असे म्हणतात वाघ्याने हिसका दिल्यावर तुटलेला लंगर शुभ मानला जातो लंगर नतुटणे अशुभ मानले जाते. एके काळी एका वाघ्याची थटा म्हणून खंडोबाचा निंदक असणाऱ्या ब्राह्मणाने त्याला तुझा खंडोबा खरा असेल तर तुझ्या एका झटक्यात तेथे पडलेली लोखंडी साखळी तुटेल असे आव्हान दिले. वाघ्याने एक हिसका देताच ती साखळी तुटली आणि त्या ब्राह्मणाचे कुत्र्यात रुपांतर झाले. ब्राम्हण पत्नी वाघ्यास शरण आली तेंव्हा वाघ्याने भंडार टाकून त्याला पुर्वव्रत केले. तेव्हा पासून हा लंगर वाघ्या खंडोबाचे शक्तीचे प्रतिक म्हणून तोडू लागला अशी जनश्रुती आहे घाटी दोन छोट्या घंटा मध्यभागी कापडी मुठीने जोडून घाटी बनवली जाते. दोन घंटा मधील मुठ हाती धरून मुरुळी खंडोबाची गाणी सादर करताना वाजवून नाचते ही इतर पुजा प्रतीके वंशपरंपरेने काही परिवारामध्ये देवघरात पुजली जातात. तर जागरणाचे वेळी वाघ्या मुरुळी यांच्या कडे असणाऱ्या या प्रतीकांची यजमान पुजा करतात * खंडोबाचे उपासक वाघ्या खंडोबास नवसाने अर्पण केलेल्या मुलास वाघ्या म्हणतात , तो खंडोबास विधिवत अर्पण केलेला असतो. वाघ्याचे दोन प्रकार पडतात. दारवाघ्या हा खंडोबाचे नावाने भटकत आपल्या उपजीविके साठी वाघ्या ही वृत्ती म्हणून स्वीकारतो भंडारी, लंगर, कोठंबा घेऊन तो देवाचे नावाने वारी ( भिक्षा ) मागून व खंडोबाचे जागरण व इतर विधी करून मिळणारे उत्पनावर आपली उपजीविका करतो, तर घर वाघ्या भंडारी, लंगर, कोठंबा यांची देवघरात पुजा करतो व उत्सवाचे वेळी ती धारण करतो इतर वेळी उपजीविकेसाठी इतर व्यवसाय नोकरी करतो मुरुळी खंडोबास अर्पण केलेल्या मुलीस मुरुळी म्हणतात, हिचे खंडोबा बरोबर विधिवत लग्न लावलेले असते. काही महिला स्वता खंडोबाला अर्पण होतात व मुरुळीचे जीवन जगतात. मुरुळी देवाची गाणी म्हणून वारी मागून व वाघ्या बरोबर जागरणात साथ करून मिळणाऱ्या उत्पनावर आपली उपजीविका करतात * धार्मिक विधी * कुलाचार कुळामध्ये परंपरेने जे धार्मिक आचार पिढ्यान पिढ्या चालत येतात त्यांना कुलाचार असे म्हणतात तळी भंडार तांब्याचे ताम्हनात खंडोबाचा टाक अथवा कलश ठेऊन त्या ताम्हनात भंडार घेऊन दिवटी पेटवली जाते अनेक जण मिळून ते ताम्हन दिवटी बरोबर घेऊन उचलतात व येळकोट चा गजर करतात. व ती आधारावर ठेऊन सर्वाना भंडार लावून प्रसाद दिला जातो पुन्हा येळकोट चा गजर करत तळी उचली जाते व मस्तकाला लावून दिवटी हातात घेऊन ताम्हन खाली ठेवले जाते. या विधीस तळी भंडार असे म्हणतात हा तळीचा विधी रविवारी, अमावस्या, पोर्णिमा, व खंडोबाचे देवकार्य प्रसंगी करण्याचा प्रघात आहे. तळी भंडाराचा विधी करताना म्हणले जाणारे गीत यात स्थान परत्वे अनेक पाठभेद आढळतात तळीभंडार गीत हरहर महादेव.....चिंतामणी मोरया.......आनंदीचा उदे उदे भैरोबाचा चांगभले बोल अहंकारा सदानंदाचा येळकोट....... येळकोट येळकोट जय मल्हार खंडेराव महाराज की जय अगडधूम नगारा सोन्याची जेजुरी देव आले जेजुरा.... नीळा घोड़ा....पायात तोडा.. कमरी करगोटा.... बेंबी हिरा... मस्तकी तुरा....अंगावर शाल सदा ही लाल आरती करी म्हाळसा सुंदरी....देव ओवाळी नाना परी खोब्रयाचा तुकडा..... भंडाराचा भड़का....... सदानंदाचा येळकोट.......येळकोट येळकोट जय मल्हार खंडेराव महाराज की जय अड्कल के भड्कल....... भड्कल के भंडार.......बोल बोल हजारी.... वाघ्या मुरूळी.......खंडोबा भगत प्रणाम प्रणाम......... सदानंदाचा येळकोट.......येळकोट येळकोट जय मल्हार खंडेराव महाराज की जय....... तळी भंडार गीत mp3 download करण्यासाठी येथे क्लिक करा तळी भंडार गीत pdf download करण्यासाठी येथे क्लिक करा जागरण खंडोबाचे कुलाचारा मधील म्हत्वाचे अंग म्हणजे जागरण होय आपल्या कुलदेवत खंडोबासाठी स्वता जागून त्याला त्याचे उपासकाकरवी जागृत करून संतुष्ट करणे व आपल्या कल्याणासाठी त्याला प्रार्थना करणे म्हणजे जागरण होय , जागरणाचे प्राचीन संदर्भ अकराव्या शतका पासून मिळतात . त्या मुळे आजच्या अनेक लोककलाचे जन्म जागरण या विधीनाट्या मधून झाले हे निश्चीत. हे विधीनाट्य अनेक विधी मधून पुढे सरकत जाते, पाचपावली, तळी भंडार, चौक भरणी, घट स्थापना, कोठंबा दिवटी पुजन करून शंकराचे स्तुतीने वाघ्या जाग्रनास सुरवात करतात व आपल्या गीता मधून देवाला जागरण स्थळी आमंत्रित करतात पुढे गण मधून खंडोबाचे अवताराचे महात्म्याचे रसपूर्ण वर्णन कथन करतात. व गवळणीच्या माध्यमातून जागरण पुढे सरकते. आणि बाणुविवाह, म्हाळसा विवाह, मणिमल्ल वध अश्या खंडोबा चरित्रामधील विविध रूपे आपल्या गायन, वादन, नृत्य, संवादातून कथानकाद्वारे सादर केली जातात रात्रीच्या पूर्वार्धाला सुरु झालेले हे भक्तीजागर उत्तररात्री पर्यंत चालते. नंतर लंगर तोडण्याचा विधी करून आरती केली जाते. ओझे उतरण्याचे कार्यक्रमाने उत्तरपुजा होते व जागरणाचा विधी संपतो रात्रभर चालणाऱ्या या जागरणाचे काळाचे ओघात तासाभराचे व पाचनामाचे असे ही प्रकार रूढ झाले आहेंत * षडरात्र घट , चंपाषष्टी मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदा ते शुद्ध षष्टी या सहा दिवसाचे कालावधीत ज्यांचे कुलदेवत खंडोबा आहे. अश्या घरामधील देवघरात घट स्थापना केली जाते, देवघरा समोर धान्याचे अष्टदल काढून त्यावर तांब्याचे ताम्हन ठवले जाते. या ताम्हनात तांब्याचा कलश मांडून त्याचे तोंडाचे काठाला बाहेरील बाजूने नागवेलीची पाच पाने बांधली जातात व कलशाचे तोंडाला आता मधून पाच पाने ठेवली जातात कलश अर्धा पाण्याने भरून घटाची पुजा केली जाते व घटावर नागवेलीच्या पानांची माळ सोडली जाते यजमान घट स्थापणे पासून घट उठे पर्यंत उपवास धरतात व देवघरात तेलाचा दिवा तेवत ठेवतात, व रोज पुलांची माळ घाटावर सोडतात. शुद्ध पंचमीस सायंकाळी बाजरीच्या पीठाचे पाच दिवे व दोन मुटके पत्रात घेऊन देवास ओवाळतात व ते पात्र देव घरा समोर बाजरीची रास करून त्यावर ठेवतात. षष्टी दिवशी देवाची पुजा केली जाते व भरीत ( वांगे व कांदा यांची भाजी ) कांद्याची पात, रोडगा (बाजरीच्या पिठात वांग्याची भाजी, पात, दुध घालून केलेली दामटी ) यांचा नेवेध्य दाखवतात व पुरण पोळीचा ही नेवेध्य दाखवतात तसेच पुरण घालून कणकीचे उकडून तयार केलेल्या पाच दिव्यांनी व दोन मुटक्यांनी देवास ओवाळतात व तळी उचली जाते. कोठंबा भरला जातो व कुत्र्यास घास दिला जातो. सहा दिवस सोडलेल्या माळा उतरून घट समाप्ती होते. देवास दाखवलेला भरीत रोडग्याचा नेवेध्य प्रसाद म्हणून भक्षण करून यजमान उपवास सोडतात * खंडोबा विविध पूजा पद्धती पूजेचे परापुजा, मानसपूजा, मूर्तीपूजा, असे विविध प्रकार आहेत, परापुजा श्रेष्ट, मानस पुजा मध्यम, व प्रतिमा पुजा कनिष्ट मानली जाते, पण जन सामान्यांना भावणारी प्रतिमा पुजा सर्वत्र प्रचलित दिसते, या पूजनात षोडशोपचारी पूजा व पंचोपचारी पूजा असे प्रकार आहेत, षोडशोपचारी पूजा षोडशोपचारी पूजा म्हणजे विविध सोळा उपचारांनी केलेले पुजन या पूजे मधे पुढील सोळा उपचार देवास देतात. १ आवाहन – देवाचे ध्यान करुन त्याला बोलावणे. २ आसन – देवाचे आसन उंच असावे. ३ पाद्य – पाय धुण्याकरिता दिलेले पाणी. ४ अर्ध्य – पाय धुतल्यानंतर सत्कार करण्यासाठी अर्ध्य दिले जातात. अर्ध्य म्हणजे गंध, अक्षता घालुन जल समरपण करणे. ५ आचमन – पिण्याकरिता किंवा चुळ भरण्याकरिता पाणी. ६ स्नान – दूध, दही, तूप, मध आणि साखर ह्या पांचानी देवाला स्नान घालतात त्याला पंचामृतस्नान म्हणतात. नंतर गंधोदकाने स्नान घालावे. ७ वस्त्र – देवाला वस्त्र अर्पण करतात. ८ यज्ञोपवीत – देवाला जानवे घालावे. ९ गंध – हळद, कुंकु, वगैरे सौभाग्यद्रव्ये, अक्षता १० पुष्प – फुले, पत्री इत्यादि ११ धुप – धुप जाळणे किंवा उदबत्ती लावणे १२ दीप – निरांजन ओवाळणे १३ नैवेद्य – दुध किंवा जेवणाचे ताट किंवा खाद्यवस्तु यांचा नैवेद्य दाखवावा. देवापुढे विडा, दक्षिणा ठेवावी. कापुर लावुन आरती म्हणावी १४ प्रदक्षिणा १५ नमस्कार – देवाला साष्टांग नमस्कार घालावा १६ मंत्रपुष्प – हाती फुले घेवुन मंत्र म्हणुन ती देवाला वाहावीत. या १६ उपचारांनी केलेली पुजा म्हणजेच षोडशोपचारी पूजा होय. विशेष प्रसंगी मंत्रोच्चारात ही षोडशोपचारी पूजा पुराणोक्त व वेदोक्त अश्या प्रकारांनी केली जाते, या मधील पुराणोक्त पुजा विशेष प्रचलित आहे, खंडोबाची पुजा करताना अभिषेक विधी वेळी रुद्र अध्यायाची आवर्तने करून एकदाशनी, रुद्र, लघुरुद्र, महारुद्र, अतिरुद्र, करण्याची प्रथा आहे,षोडशोपचारी पूजा पुराणोक्त व वेदोक्त पद्धतीने करताना प्रथम आचमन, देवता ध्यान , देशकालाचे उच्चारण, संकल्प, करण्याचा प्रघात आहे . मल्हारी षोडशोपचारी पुजा संहिता वाचण्यासाठी pdf download करण्यासाठी येथे क्लिक करा पंचोपचारी पूजा विविध पाच उपचारांनी केलेली पुजा म्हणजे पंचोपचार पुजा होय, या पूजनात पुढील पाच उपचारांचा समावेश होतो गंध, पुष्प, धूप, दीप व नैवेद्य यांचा समावेश होतो. १ गंध – हळद, कुंकु, वगैरे सौभाग्यद्रव्ये, अक्षता २ पुष्प – फुले, पत्री इत्यादि ३ धुप – धुप जाळणे किंवा उदबत्ती लावणे ४ दीप – निरांजन ओवाळणे ५ नैवेद्य – दुध किंवा किंवा खाद्यवस्तु यांचा नैवेद्य दाखवावा. देवापुढे विडा, दक्षिणा ठेवावी. कापुर लावुन आरती म्हणावी ज्या प्रतिमांना स्नान घालणे शक्य नाही, अश्या वेळी ही पद्धती प्रचलित दिसते * सप्त पुजा मार्तंड विजय या ग्रंथात काही पुजा प्रकारांची माहिती दिली आहे बिल्वपुजा - या पूजेत बेलाचे पाने देवास वाहिली जातात या बेलाचे पानांनी बांधलेल्या पुजेस बिल्वपुजा असे म्हणतात गंध पुजा - चंदनाचे गंधाने केलेलीपुजा भात पुजा - भाताने बांधलेली पुजा भंडार पुजा - हळदीच्या चुर्णाने बांधलेली पुजा धान्य पुजा - गहू , तांदूळ, हिरवे मुग, तांबडा म्हसुर, हरबरा डाळ इत्यादी धान्यांनी बांधलेली पुजा दवणा पुजा - दवण्याने बांधलेली पुजा पुष्प पुजा - विविध फुलांनी बांधलेली पुजा * खंडोबा विविध व्रते खंडोबा उपसणे मध्ये कुलधर्म कुलाचारा बरोबर अनेक प्रथा दिसतात, यात अनेक व्रते, नियम आढळतात, यातील काही व्रतांचा कुलाचार म्हणून काही परिवारात पालन केले जाते. खंडोबा उपासनेत आढळणाऱ्या काही व्रतांचा हा परिचय एकवीस रविवार व्रत हे व्रत सलग २१ रविवार करून २१वे रविवारी याचे उद्यापन केले जाते, ज्या रविवार पासुन या व्रताचा संकल्प करावयाचा आहे त्या रविवारी प्रातविधी आटोपून पिवळी वस्त्र धारण केले जातात, देवघरामध्ये खंडोबाचे पुजन करून व्रताचा संकल्प केला जातो, व मल्हारी कवच अथवा मल्हारी नामाचा जप केला जातो व उपवास धरला जातो सायंकाळी भंडार, पिवळी फुले, दवणा, पुजा साहित्य घेऊन खंडोबाचे षोडशोपचारे पुजन करून खिरीचा नेवेद्य दाखविला जातो, व बाजरी पीठाचे ९ दिवे करून तुपाचे वतीने पेटवून खंडोबाची आरती केली जाते, व तळी भंडार केला जातो २१ रविवार हा नेम पाळला जातो. २१ वे रविवारी सायंकाळी या पुजे नंतर २१ दांपत्याना मिष्टान्न भोजन दिले जाते, व रात्री जागरण घालून या व्रताचे उद्यापन केले जाते शनिवार व्रत हे व्रत कायम स्वरूपी अथवा ७ शनिवार केले जाते, ज्या शनिवार पासुन व्रतास आरंभ करावयाचा आहे त्या दिवशी उपवास धरला जातो सायंकाळी स्नान करून पुजा केले जाते , देवघरासमोर ओल्या हळदीचे लिंग तयार करून त्याची षोडशोपचारे पुजा केली जाते पूजेत पिवळा अष्टगंध, भंडार, पिवळ्या अक्षदा, पिवळी फुले, बेल यांचा समावेश असतो, नेवेद्य दाखवून कापुराने खंडोबाची आरती केली जाते, रविवारी सकाळी लिंगाचे पुजन करून पुजा विसर्जन करतात व कुत्र्यास घास देऊन उपवास सोडतात उद्यापनास नियमा प्रमाणे, पुजन करून शनिवारी सायंकाळी ७ दांपत्याना मिष्टान्न भोजन दिले जाते, व रात्री जागरण घालून रविवारी सकाळी लिंगाचे पुजन करून पुजा विसर्जन करतात व कुत्र्यास घास देऊन उपवास सोडतात पौर्णिमा व्रत वर्ष भरत येणाऱ्या पौर्णिमाना हे व्रत केले जाते. पौर्णिमेस सकाळी स्नान करून उपवास धरला जातो सायंकाळी स्नान करून पुजा केले जाते , देवघरासमोर ओल्या हळदीचे लिंग तयार करून त्याची षोडशोपचारे पुजा केली जाते पूजेत पिवळा अष्टगंध, भंडार, पिवळ्या अक्षदा, पिवळी फुले, बेल यांचा समावेश असतो, पुजनात प्रत्येक पौर्णिमेस वेगवेगळ्या वस्तू पदार्थ खंडोबास अर्पण केल्या जातात यांची संख्या ३२५ अथवा यथा शक्ती ७ असते . चैत्र - सुगंधी उदक, वैशाख - बुंदीचे लाडू , जेष्ठ - जिलेबी , आषाढ - पानाचे विडे , श्रावण - पौती, भाद्रपद - केतकीचे पान, अश्विन - मसाले दुध, कार्तिक - बाजरीचे पीठाचे दिवे, मार्गशीर्ष - उडीद वडे, पौष - तिळाचे लाडू, माघ - क्षिप्रा, फाल्गुन- सुवर्ण पुष्प / आपटा, अधिक - अनारसे, या प्रमाणे नेवेद्य दाखवून खंडोबाची आरती केली जाते, उपवास सोडतात दुसऱ्या दिवशी सकाळी पुजन करून पुजा विसर्जन करतात उद्यापनास नियमा प्रमाणे, पुजन करून सायंकाळी ७ दांपत्याना मिष्टान्न भोजन दिले जाते, व रात्री जागरण घालून पुजन करून पुजा विसर्जन करतात चतुर्थ पौर्णिमा व्रत खंडोबा अवतारात ४ पौर्णिमा महत्वाच्या मानल्या जातात, चैत्र पौर्णिमा - मार्तंड भैरव अवतार, श्रावण पौर्णिमा - बाणु विवाह, पौष पौर्णिमा - म्हाळसा विवाह, माघ पौर्णिमा - म्हाळसा जन्म, या चार पौर्णिमाना केले जाणारे व्रत म्हणजेच चतुर्थ पौर्णिमा व्रत पौर्णिमे दिवशी उपवास धरला जातो दिवसा मध्यान्ह समयी खंडोबाची षोडशोपचारे पुजा केली जाते पूजेत पिवळा अष्टगंध, भंडार, पिवळ्या अक्षदा, पिवळी फुले, बेल यांचा समावेश असतो नेवेद्यास चैत्र पौर्णिमेस असंख्य विविध पदार्थ असतात, श्रावण पौर्णिमा - खीर , पौष पौर्णिमा - तांदळाची खिचडी व तीळवडी, माघ पौर्णिमा - पुरण पोळी, हे पदार्थ असतात, पुरणाचे दिव्यांनी आरती करून उपवास सोडतात व रात्री नीरशनाचा फराळ केला जातो. चैत्र व्रत चैत्र शुद्ध दशमी ते पौर्णिमा या सहा दिवसात हे व्रत केले जाते, चैत्र पौर्णिमा हा मार्तंड भैरवाचा अवतार दिन, या अवतारासाठी ऋषीगणांनी हे सहा दिवस हे हे व्रत केल्याचे मानले जाते. चैत्र शुद्ध दशमीस सकाळी उपवास धरतात व देवघरात घट स्थापना केली जाते, देवघरा समोर धान्याचे अष्टदल काढून त्यावर तांब्याचे ताम्हन ठवले जाते. या ताम्हनात तांब्याचा कलश मांडून त्याचे तोंडाचे काठाला बाहेरील बाजूने नागवेलीची पाच पाने बांधली जातात व कलशाचे तोंडाला आता मधून पाच पाने ठेवली जातात कलश अर्धा पाण्याने भरून घटाची पुजा केली जाते व घटावर नागवेलीच्या पानांची माळ सोडली जाते यजमान घट स्थापणे पासून घट उठे पर्यंत उपवास धरतात व देवघरात तेलाचा दिवा तेवत ठेवतात, व रोज पुलांची माळ घाटावर सोडतात. चैत्र पौर्णिमेस मध्यान्ह वेळी पुजा साहित्य घेऊन खंडोबाचे षोडशोपचारे पुजन करून नेवेद्य दाखविला जातो, तळी उचली जाते. कोठंबा भरला जातो व कुत्र्यास घास दिला जातो. सहा दिवस सोडलेल्या माळा उतरून घट समाप्ती होते. देवास दाखवलेला नेवेध्य प्रसाद म्हणून भक्षण करून यजमान उपवास सोडतात हिंदोळा व्रत उत्सव चैत्र शुद्ध तृतीया ते वैशाख शुद्ध तृतीया असा महिनाभर चालणारा हा उत्सव असुन यात चैत्र शुद्ध तृतीयेस खंडोबा म्हाळसा यांची मूर्तीची षोडशोपचारे पुजन करून झोपाळ्यात स्थापना केली जाते, रोज त्रिकाळ षोडशोपचारे पुजन केले जाते, हळदी कुंकू सभारंभ , हिंदोळा गीते गाणे फेर धरणे, टिपरी रोज रात्री देवाचे जागरण घालणे, नामाचा जागर, , अश्या विविध कार्यक्रमांनी देव जागवितात, वैशाख शुद्ध तृतीयेस उत्सवाचे विसर्जन करून या उत्सवाची सागता होते. तळी भंडार व्रत खंडोबाचे कुलधर्म कुलाचारातील तळी भंडार हा एक विधी काही लोक व्रत म्हणून आचरतात,तांब्याचे ताम्हनात खंडोबाचा टाक अथवा कलश ठेऊन त्या ताम्हनात भंडार घेऊन दिवटी पेटवली जाते अनेक जण मिळून ते ताम्हन दिवटी बरोबर घेऊन उचलतात व येळकोट चा गजर करतात. व ती आधारावर ठेऊन सर्वाना भंडार लावून प्रसाद दिला जातो पुन्हा येळकोट चा गजर करत तळी उचली जाते व मस्तकाला लावून दिवटी हातात घेऊन ताम्हन खाली ठेवले जाते. या विधीस तळी भंडार असे म्हणतात प्रत्येक रविवारी , प्रत्येक पौर्णिमा अथवा अमावस्या या दिवशी तळी भंडार करण्याचा नेम आचरून हे व्रत करतात वारी मागणे सकाळी स्नान करून हाती कोटंबा घेऊन किमान पाच घरे वारी मागितली जाते, भंडाराची वारी मागून मिळालेला भंडार देवावर उधळून मस्तकी धारण करतात, तर धान्य अथवा भोजनाची वारी मागितल्यास तो प्रसाद म्हणून भक्षण केला जातो. वारी रविवार, अमावस्या ,पौर्णिमा अश्या नियमाने मागून हे व्रत आचरिले जाते. मणि मल्ला पासुन रक्षणासाठी ऋषीगणांनी देवाकडे निराभिमानी होऊन याचना केली व देवाने त्यांचे रक्षण केले. तेव्हा ऋषींनी निराभिमानी होऊन तुझी वारी मागणार्यांचे रक्षण कर असा वर मागितला व देवांनी तो दिला म्हणून वारी मागितली जाते खंडोबाची वारी करणे विशिष्ट नियमाने एखाद्या खंडोबा क्षेत्री जाणे याला खंडोबाची वारी करणे असे म्हणतात तर अशी वारी करणार्यांना खंडोबाचा वारकरी म्हटले जाते. खंडोबा क्षेत्री रविवार, अमावस्या, पौर्णिमा, शनिवार, अथवा विशिष्ट यात्रांना नियमाने नियमित जाणे म्हणजे वारी करणे होय. विशिष्ट दिवस व क्षेत्र यांचा भेटीचा नियम आचरून वारीचे व्रत आचरिले जाते खंडोबाची खेटी घालणे एखादा विशिष्ट संकल्प करून खंडोबा क्षेत्रास दर्शनास नियमाने जाणे यास खेटी घालणे असे म्हणतात . रविवार, अमावस्या, पौर्णिमा, अश्या खंडोबा उपासनेतील दिवसाची निवड करून ५, ७, ११, अश्या विषम संख्येत सलग त्या दिवसांना क्षेत्र दर्शनाचा संकल्प करून तो पुर्ण केला जातो. शेवटच्या खेटी वेळेस खंडोबाचा कुलधर्म कुलाचार करून खेटीचा संकल्प पुर्ण केला जातो कावड घालणे नदी वरून अथवा जलाशयावरून पाण्याने भरलेला कलश आणून देवास घालणे यास कावड घालणे असे म्हणतात. मनोऐछिक दिवस व कालावधी यांचा संकल्प करून खंडोबा क्षेत्री कावड घातली जाते सकाळी उठून जलाशयावर जाऊन स्नान करून कावड भरून ते पाणी मंदिरात देवास घालून भंडार वाहुन कवडीचा नेम पुर्ण केला जातो उदक दान माघ वद्य चतुर्दशी ते वैशाख अमावस्या या कालावधी मध्ये रस्त्यावर मल्हारी नामाने पाणपोई निर्माण करून प्रवाश्यांना पाणी दान करणे म्हणजे उदकदान व्रत होय. अश्विन शनिवार व्रत अश्विन महिन्यात येणाऱ्या प्रत्येक शनिवारी उपवास धरून , रात्री देवास दुग्ध अभिषेक करतात , देवास पक्वानाचा नेवेध्य दाखवून , रात्री देवाचा जागर केला जातो. रविवारी अन्नदान करून उपवास सोडतात. रविवार व्रत प्रत्येक रविवारी उपवास धरला जातो मध्यान्ह वेळी देवाचे पुजन करून नेवेध्य दाखवून प्रसाद भक्षण करून उपवास सोडतात, व रात्री नीरशनाचा फराळ केला जातो. * खंडोबा पुजा वस्तु हळद - (Turmeric ) - हळद ही बहुगुणी असुन औषधी, सौदर्य वर्धक म्हणूनही तिचा वापर होता, खंडोबा उपासनेत हळदी चुर्णाला महत्वाचे स्थान आहे असुन भंडार या नावाने ती प्रचलित आहे, खंडोबास ती प्रिय असल्याने खंडोबाचे धार्मिक विधीत तिचा समावेश असतो, धार्मिक कथा मधून शंकरांनी तिची निर्मिती केल्याचे मानले जाते. शिवसभेत सर्व गण बसलेले असताना त्या सर्वांचा गौर वर्ण पाहून रजनीला आपल्या कृष्ण वर्णाची खंत वाटली, तिने शंकराची आराधना केली व शंकरांनी तीला तु गौर वर्ण होऊन एक वनस्पतीच्या रूपाने वास करशील व पुढील अवतारात मी तुला अंगी धारण करील असा वर दिला , रजनी कैलास पर्वतावरील स्कंध शिखरावर वनस्पती रूपाने जन्माला आली व पार्वतीने तिचे मुळाचे चूर्ण करून अंगास लावले, ती योगनिद्रा म्हणून प्रसिद्ध पावली, मणिमल्लाचे भीतीने तिने पाताळात वास केला, ब्रह्म, विष्णू , महेशांनी तिचा शोध केल्यावर ती विष्णूच्या आसनाखाली प्रगट झाली, व माझे चूर्ण करून अंगास लावल्याने शत्रूचा नाश होईल असे सांगितले, शंकराने मार्तंड भैरव अवतार धारण केल्यावर ऋषी गणांनी हरिद्रा चूर्णाची उधळण केली, शंकराचे वचना प्रमाणे ती या अवतारात खंडोबास प्रिय झाली, म्हणून खंडोबा उपासनेत तीला विशेष महत्व आहे, चिमुटभर हरिद्रा चूर्ण खंडोबास वाहिल्याने पुण्य प्राप्त होते अशी लोक श्रद्धा आहे. दवणा ( Artemisia pallens ) ही एक सुगंधी वनस्पती असुन हिचा उपयोग, सुवासिक द्रवे, उदबत्ती बाविण्यासाठी केला जातो, खंडोबा उपासनेत तिचे स्थान महत्वाचे असुन त्या विषयी कथा प्रचलित आहे. दवणा नावाचा एक शिवगण होता आपणास शंकरांनी धोत्र्याचे फुला प्रमाणे अंगी धारण करावे अशी त्याची इच्छा झाली, त्याची आराधना स्वीकारून तु सुगंधी वनस्पती म्हणून जन्मास येशील व मी तुला अंगी धारण करेन असा वर दिला, व आपल्या खंडोबा अवतारात दवणा आपल्या शिरी धारण केला, दवणा खंडोबास अतिशय प्रिय असुन तो वाहिल्याने खंडोबा संतुष्ट होतो अशी समाज श्रद्धा आहे, त्यामुळे खंडोबा उपासनेत त्याला महत्वाचे स्थान आहे. खोबरे - खंडोबानी मणि मल्लावर विजय मिळविल्यावर देवांनी सुवर्ण मुद्रांची व ऋषी गणांनी भंडाराची उधळण करून विजय उत्सव साजरा केला, या मुळे देवावर भंडार व सुवर्ण मुद्राची उधळण करण्याचा प्रघात पडला व देवांना संतुष्ट करण्यासाठी लोक सुवर्ण मुद्रा व भंडाराची उधळण करू लागले. खंडोबाचा निस्चीम भक्त असणाऱ्या एका धनगर भक्तास सुवर्ण मुद्रा उधळणे शक्य नव्हते, त्याने देवाची करुणा भाकली व सुवर्ण मुद्रा ऐवजी खोबर्याचे तुकडे भंडारात उधळले त्याचे भक्तीने खंडोबा संतुष्ट झाले, व भक्तांनी वाहिलेले खोबरे माझ्या साठी सुवर्ण समान असुन त्या भक्तांचे मनोरथ पुर्ण करण्याचा वर धनगराला दिला तेव्हा पासुन खंडोबास खोबरे प्रिय झाले व लोक देवाला खोबरे वाहु लागले अशी लोककथा सांगते , त्यामुळे खंडोबाचे धार्मिक विधीत खोबरे महत्व पुर्ण मानले जाते. * खंडोबा आरती, मंत्र, स्तोत्र जेजुरगड पर्वत - आरती जेजुरगडपर्वत शिवलिंगाकार । मृत्युलोकी दुसरे कैलास शिखर ॥ नानापरिची रचना रचिली अपार । तये स्थळी नांदे स्वामी शंकर ॥ १ ॥ जय देव जय देव शिवमार्तंडा । अरिमर्दन मल्लारी तूंची प्रचंडा ॥ धृ. ॥ मणिमल्ल दैत्य प्रबळ तो झाला । त्रिभुवनी त्याने प्रळय मांडिला ॥ नाटोपे कोणास वरे मातला । देवगण गंधर्व कांपती त्याला ॥ जय. ॥ २ ॥ चंपाषष्ठी दिवशी अवतार धरिसी । मणिमल्ल दैत्यांचा संहार करिसी । चरणी पृष्ठी खंङ्‌गें वर्मी स्थापीसी । अंती वर देउनि त्या मुक्तीते देशी ॥ जय. ॥ ३ ॥ मणिमल्ल दैत्य मर्दुनी मल्लारी । देवा संकट पडतां राहे जेजुरी ॥ अर्धांगी म्हाळसा शोभे सुंदरी । देवा ठाय मागे दास नरहरि ॥ जय. ॥ ४ ॥ ***** पंचानन हयवाहन - आरती पंचानन हयवाहन सुरभूषितनीळा । खंडामंडित दंडित दानव अवलीळा ॥ मणिमल्ल मर्दुनियां जों धूसुर पिवळा । हिरे कंकण बासिंगे सुमनांच्या माळा ॥ १ ॥ जय देव जय देव जय शिव मल्हारी । वारीं दुर्जनअसुरा भवदुस्तर तारी ॥ धृ. ॥ सुरवरसंवर वर दे मजलामी देवा । नाना नामे गाइन ही तुमची सेवा ॥ अघटित गुण गावया वाटतसे हेवा । फणिवर शिणला किती नर पामर केवा ॥ २ ॥ रघुवीरस्मरणी शंकर ह्रुदयीं निवाला । तो हा मल्लांतक अवतार झाला ॥ यालागीं आवडे भाव वर्णीला । रामी रामदासा जिवलग भेटला ॥ जय देव.॥ ३ ॥ मल्हारी ध्यान ध्यायेन्मल्लारिदेवं कनकगिरीनिभं म्हाळसा भूषितांकम l श्वेताश्वम् खडःग हस्तं विबुधबुधगणै सेव्यमानं कृतार्थे l युक्तांघ्रि दैत्यमुन्ध्री डमरु विलसितं नैशचूर्णाभिरामम l नित्यं भक्तेषु तुष्टं श्वगण परिवृत्तं नित्यमोङ्काररूपम् ll मल्हारी करुणाष्टक मल्हारी करुना करी मजवरी ताप त्रयाते हारी तारी या भवसागरी मजसी या रंकासी हाती धरी म्हाळसापती स्वामी राजसा पावसी मला सत्य भरवसा म्हणुनिया तुझी मांडली स्तुती पाव सत्वरे म्हाळसापती आस हि तुझी फार लागली, दे दया नी दे बुद्धी चांगली देऊ तू नको दुष्ट वासना, तूची आवरी आमुच्या मना वागवया सर्व सृष्टीला, शक्ती बा असे एक तुजला सर्व शक्ती तू सर्व देखणा, कोण जाणतो तुझिया गुणा माणसे आम्ही सर्व लेकरे, मायबाप तू हे असे खरे तुझिया कृपेवीण ईश्वरा, आसरा आम्हा नाही दुसरा म्हाळसापती स्वामी राजसा पावसी मला सत्य भरवसा म्हणुनिया तुझी मांडली स्तुती पाव सत्वरे म्हाळसापती... भंडार मंत्र मल्हारी कवच ll श्री गणेशाय नमः ll अस्यश्रीमल्लारीकवचमंत्रस्य l स्कंदऋषिः l श्रीमल्हारीदेवता l अनुष्ठुपछंदःl श्रीमल्लारीकवचजपेविनियोगःll सनत्कुमार उवाच l मुनीनां सप्तकोटीनां l वरदं भक्तवत्सलम l दुष्ट मर्दन देवेशं l वंदेहं म्हाळसापतिम ll अनुग्रहाय देवानां l मणिरत्नगिरौस्थितं l प्रसन्नवदनं नित्यं l वंदेहं मल्ल वैरिणं ll सर्वदेवमयं शांत l कौमारं करुणाकरं l आदिरुद्र महारुद्र l वंदेहं सवित्वकप्रियम ll भुक्तीमुक्ती प्रदं देवं l सर्वाभरणभूषितं ll कोटिसूर्यप्रतीकाशं l वंदेहं असुरांतकं ll आदिदेवं महादेवं l मल्लारी परमेश्वरम l वीरस्त्वस्त्याविरुपाक्षं l वंदेहं भक्तवत्सलं ll भोगरूपपरं ज्योतिः l शिरोमाला विभूषितं l त्रिशलादिधरं देवं l वंदेहं लोकरक्षकं ll इदं पठति यो भक्त्या l मल्लारी प्रतिकारकं l भक्तानां वरदं नित्यं l प्रणतोस्मिमहेश्वरं ll वने रणे महादुर्गे l राजचौर भयोप्युत l शाकिनीडाकिनीभूत l पिशाचोरगराक्षसःl ग्रहपिडासु रोगेषु l विषसर्पभयेषुच ll सदा मल्लारीमल्लारी l मल्लारीतिकीर्तनं l सप्तजन्मकृतं पापं l तत्क्षणादेव नश्यति ll त्रिकालेतु पठे नित्यं l विष्णू लोकंस गच्छंती l देहांतेतु तप्राप्नोती l सर्व लोके महीयते ll इति श्रीब्रह्मांडपुराणे l क्षेत्रखंडे मल्लारीमहात्मे l मल्लारीकवचं संपूर्णम ll * भुपाळी प्रातःकाळी उठूनी गणपतीचे, करि विष्णू स्मरण काशी उज्जैनी, औंढी परळी, त्र्यंबक त्रिनयन सोमनाथ सोरटी, बद्रि केदार रामेश्वरी स्नान श्रीशैल्य मल्लिकार्जुन, वेरूळ मांधता जाण मातृलिंग गोकर्ण तारिले, चांडाळी विघ्न भक्ता लाभ्या ऋषी, स्मरावे दत्त हनुमान मोक्षांच्या पु-या सात, हरिद्वार कांची पहा द्वारका जगन्नाथ, पंचवटीत क्षणभरी रहा गंगोत्री कुशावर्त, जळ निर्मळ गंगा न्हा विठ्ठल चरणी वाहू तुळसी, भक्त करील साह्य सगनभाऊ मारुतीस म्हणती, नाथ प्रसन्न आहे रूपतेज दीपतेज, रवी उदयास्तव येऊ पाही सगनभाऊ मारुतीस म्हणती, नाथ प्रसन्न आहे वृक्ष बकुळे वरती पक्षी रावे गजबजती कागांचा कलकलाट, द्वारी चिमण्या चिवचिवती बदक तळ्यात पक्षी कोकिळा आंबेवनी राहती उंच वृक्षावर तास पिंगळे, मोर ठाय करती कुंभ घेउनिया शिरी, देवांगना पाण्याला जाती कायापूर जेजुरी, शुद्ध सतरावी क-हा वाहती लेप सुगंधीत उटणे, बानू म्हाळसा लाविती घंगाळी उष्ण उदक, देव चौरंगी न्हाती पिवळे पितांबर कस्तुरी टिळा लेती उभी फुलाई माळीन, गळा हार घालिती एक मालावती मुरुळी, गुण आवडीने गाती रंभाई शिंपीण बरवी, शेल्याला दोरा बरवी अलंकार पिवळे, अंगावर शाल जोडी पिवळी दिले चंदनाचे पाट बसाया, घालिती रांगोळी उठी लवकर मलुराय, म्हाळसा बोले प्रातःकाळी उटणे मी लाविते तुम्हाला, सण आज दिपवाळी छत मंडप झालरी फुलांचे, पडदे मंदिरी ठायी ठायी उदबत्त्या द्वारी, सुगंधीत सारी ऐनेमहाल चमचमा चमकती, हंडया बिलवरी घ्या दिवटी जळे मशाल, पडला प्रकाश महाद्वारी अंगणात दीपमाळा पेटल्या, आगीन झाडी चारी ऐनेमहाल लखलखा झळकतो, कळस सोनेरी सडे सुगंधीत अंगणे, वर रांगोळ्या पाट हरोहर समया जळती, ऋषी पंक्तीचा थाट बानू म्हाळसा वाढती, हाती सोन्याचे ताट अमृत फळ नारंगी, गोड द्राक्षे अंजीर केळी पुढे तबकामध्ये आणून ठेविती, मालावती मुरुळी उठी लवकर मलुराय, म्हाळसा बोले प्रातःकाळी उटणे मी लाविते तुम्हाला, सण आज दिपवाळी. सुगंधीत मुखी विडे रत्न, लांबची प्रभा दिसती भरगच्चे पोशाख अंगावर, जाम पैरण दस्ती शिरमंदील शिरपेच, कंठी चौकडा ठाव देती वर मोत्यांचा तुरा चमकतो, दीपकांच्या ज्योती चुण्या करून पोशाख, म्हाळसा तबकामध्ये ठेविती डूब दागिण्यामध्ये, बानूबाई शृंगार रस नटती करून सोळा शृंगार, म्हाळसा पडद्यातून पाहती जामदार करी हारहरोहर हुकुमामध्ये राहती चालता गजर चरणी, शेष पाताळी डुलती ऐकुनिया नाद शिखरी , वर पारवे घुमती लखलखाट बिजल्यांचा, तारे स्वरूपांचे तुटती जरी पदराचा झोक शेलारी, निर्गुणची पिवळी केळी कर्दळीचा गाभा, म्हाळसा फुल चाफेकळी उठी लवकर मलुराय, म्हाळसा बोले प्रातःकाळी उटणे मी लाविते तुम्हाला, सण आज दिपवाळी परमेश्वर शिवसांभ कृपाघन, सोमनाथ सोरटी शक्तीयुक्ती सर्वांग भूषणे, हिमगिरीजा गोरटी महांकाळ कंकाळ काळहर, काळ केशरी शिवा अष्टमुर्ती लक्षणा शैल्यशिव, दुःख निवारक शिवा रेवा तट वासा , वासूकी धरा निर्गुण निर्विकल्पा, निर्गुणा निष्कलंका तांडवा धीश देवा, विश्व पाताल पालका प्रथमनाथ मृत्युंजय, तारका विश्वेश्वर शम्भो सकलनायका लांछि फुलान्तक, मणी मल्लांतक विभो उठी लवकर मलुराय, म्हाळसा बोले प्रातःकाळी उटणे मी लाविते तुम्हाला, सण आज दिपवाळी. त्रिभुवनी सभा घनदाट बैसले, देव तेहतीसकोटी आले नारद तुंबर सभेमध्ये, सांगती गोष्टी वाघ्या मुरुळ्यांचा हजर गजर, पुढे वाजती घाटी अनुहात गगनात चौघडे, यात्रेची दाटी गुरु मुकुंदराज प्रसन्न, गोडनाम बापूंच्या कंठी हरिभाऊची जोडी ऋणानुबंध , वक्तशीर गाठी पूर्वीचे सुकृत फळा, आले हो शेवटी मलुनाम हे अक्षर भळा, लिहिले लल्लाटी माझे सहस्त्र अपराध, देवा घालावे पोटी करा कृपेची छाया जागा द्या, मज चरणा जवळी हेच मागणे तुम्हा मागतो, नामा त्रिकाळी उठी लवकर मलुराय, म्हाळसा बोले प्रातःकाळी उटणे मी लाविते तुम्हाला, सण आज दिपवाळी ***** पंचाक्षरी धावपाव लवकरी दयाळा पठारच्या मल्हारी प्रभो तुम्ही जेजुरी च्या मल्हारी तुझे गुण गातो हृदयी स्मरतो करून पंचाक्षरी ll धृ ll क क क क काय तुझे गुण वर्णावे दयाळा ख ख ख ख खंड्याचा हात भला रे तुजला ग ग ग ग गंग्या वारूवर स्वार रंग पिवळा घ घ घ घ घटका सोन्याची जाते अमृत वेळा न न न न नमस्कार हा लोळे चरणावरी तुझे गुण गातो हृदयी स्मरतो करून पंचाक्षरी ll १ ll च च च च चमकतो वारू देखिला नयनी छ छ छ छ छाया कृपेची कर देवा येउनी ज ज ज ज जाई जुईंचे हार गुंफित बैसुनी झ झ झ झ झटकन देवा यावे त्वा धावूनी य य य येऊन निद्रेत तु सांभाळ करी तुझे गुण गातो हृदयी स्मरतो करून पंचाक्षरी ll २ ll ट ट ट ट टाण टोण्याचा धरा भंडारावरी ठ ठ ठ ठ ठाण ठोकतो आहेस आमुच्या शिरी ड ड ड ड डवहंकार करू नको गर्व धरू अंतरी ढ ढ ढ ढ ढाल नामाची उभास भिंतीवरी न न न न नमस्कार हा लोळे चरणावरी तुझे गुण गातो हृदयी स्मरतो करून पंचाक्षरी ll ३ ll ******** स्तवन गिरीवरचे गिरीवर नायक पठारलिंगा, जेजुरलिंगा, आदिशक्ती म्हाळसा बानू शोभती गंगा ll धृ ll पदी घालूनी बळकट मिठी, पहावी शोधूनी अंतरदृष्टी, प्रभूने रचला रचली सृष्टी त्यामध्ये भक्त जनांच्या भेटी होती सत्संगा, आदिशक्ती म्हाळसा बानू शोभती गंगा ll १ ll शिवशिव नामामृत रस सार सेवन करावे वारंवार, जावे भवसागर उतरुनी पार भुक्ती मुक्तींचे दरबार रंगले रंगा, आदिशक्ती म्हाळसा बानू शोभती गंगा ll २ ll धरुनी हृदयांतरी विश्वास, करुनि षडःकर्मांचा नाश, जावे भवबंधन तोडूनी पाश जगदीश पुरवतील आस मिटवतील दंगा, आदिशक्ती म्हाळसा बानू शोभती गंगा ll ३ ll रामभाऊ सदा सेवाकरी महाली, गळयामध्ये घालूनिया भंडारी उभा असे सद्गुरुनाथांचे द्वारी कर जोडूनी मागतो वारी मिळूनी सत्संगा आदिशक्ती म्हाळसा बानू शोभती गंगा ll ४ ll या विभागातील माहितीचे काम सुरु आहे. लवकरच पूर्ण स्वरुपात भेटू या मुख्यपृष्ठ Translate Site Powered by Translate जयमल्हार jejuri show photo jejurinet.gif जेजुरी गड कडेपठार जेजुरी यात्रा,उत्सव,परंपरा जेजुरी प्रेक्षणीय स्थळे जेजुरी पर्यटक माहिती जेजुरी भौगोलिक व पर्यावरण जेजुरी ऐतिहासिक व सांस्कृतिक जेजुरी परिसरातील प्रेक्षणीय स्थळे खंडोबा परिवार देवता,पुजा प्रतीके,धार्मिक विधी खंडोबा ग्रंथ, साहित्य, कला, लोकवाणी महाराष्ट्र खंडोबा मंदिरे कर्नाटक खंडोबा मंदिरे आंध्रप्रदेश खंडोबा मंदिरे संपर्क प्रतिक्रिया देवघरातील कुलदेवतांचे टाक विषयी माहिती साठी क्लिक करा बाह्य संकेत दुवे जयाद्री मित्र परिवार जेजुरीचा हवामान अंदाज Jejuri Weather Forecast Fri 30°C21°C Chance of light rain almost all day. [details] Sat 30°C20°C Chance of light rain before sunrise and in the afternoon. [details] © 2009 Ganesh Tak - 9822394915 - Unauthorized use and/or duplication of this material without express and written permission from this site author is strictly prohibited. Excerpts and links may be used, provided that full and clear credit is given to writer and jejuri.net with appropriate and specific direction to the original content. jejuri, jejuri gad, jejuri kadepathar, jejuri khanboba temple, jejuri travel, jejuri celebration, jejuri geographical, jejuri environmental, jejuri historical, jejuri cultural, jejuri observationl tour, jejuri information. khandoba family deity, khandoba prtice worship, khandoba religious rituals, khandoba temples. khandoba pali, khandoba shegud, khandoba satare, khandoba naldurga, khandoba andur, khandoba nimgon, khandoba malegoan, mailar mailapur, mailar mangsuli, mailarlinga adimailar, maltesh devergudda, maylar mrunmilar,mallanna komarveli, mallanna inavolu, DMCA
Posted on: Thu, 26 Sep 2013 14:58:20 +0000

Trending Topics



div>

Recently Viewed Topics




© 2015