भाग १ वरुन पुढे - TopicsExpress



          

भाग १ वरुन पुढे >> रामुकाका स्वयंपाकघरातील भिंत आणि छत जिथे एकत्र होते त्या कोनापाशी एकटक बघत होते.. जणु काही तिथे काहीतरी होते… दबा धरुन बसलेले. कदाचीत मानवी डोळ्यांना ‘ते’ दिसत नव्हते, पण अथांग शक्ती असलेल्या मनाला ते जाणवत होते.. “रामुकाका?”, शाल्मलीने दारातुनच हाक मारली. शाल्मलीच्या हाकेने रामुकाका एकदम भानावर आले. “काय झालं रामुकाका? काय बघत होतात??”, शाल्मलीने विचारले. रामुकाकांनी शाल्मलीचा एक हात त्यांच्या हातात घट्ट पकडला.. आणि नुसत्या डोळ्यांनी खुण करुन ते शाल्मलीला म्हणाले, “ते बघ.. तिथे कोपर्यात..काही दिसते आहे तुला???” शाल्मलीने सर्वत्र निरखुन पाहीले.. “नाही.. नाही रामुकाका!! काही नाहीये तिथे.. काय दिसते आहे तुम्हाला?” “नाही, मला पण काही दिसत नाहीये.. पण.. काही तरी नक्कीच आहे तिथे.. दिसत नसलं तरी जाणवतं आहे…”, रामुकाका शाल्मलीचा चेहरा भितीने पांढराफटक पडला होता. भितीने तिने एक आवंढा गिळला.. “नका ना हो रामुकाका असं बोलु. कश्याला घाबरवता आहात, नाहीये तिथे काहीच.. तुम्ही नका बघु तिकडे, तुम्हाला स्वयंपाकात काही मदत हवी आहे का??”, शाल्मली. “बेटा.. कोपरा.. खासकरुन भिंतीचा वरचा कोपरा.. तुला माहीती आहे काय विशेष असतं कोपर्याचं?”, रामुकाका शाल्मलीने पुन्हा एकदा रामुकाका बघत होते तिकडे नजर टाकली आणि मानेनेच तिने नाही अशी खूण केली. “भिंतीचा कोपरा.. नेहमी संगम असतो चांगल्या- वाईटाचा. परंतु वरचा कोपरा.. तिथे जमीन आणि अवकाश एकत्र मिळते.. एक शक्ती असते त्या कोपर्यात. कधी चांगली…. कधी………”, बोलता बोलता रामुकाका थांबले.. “मी.. मी जाते बाहेर.. तुम्हाला काही लागलं तर हाक मारा..”, असं म्हणुन शाल्मली बाहेर पळाली. दिवाणखान्यात मोहीत आणि आकाशची उश्यांची मारामारी चालु होती. शाल्मलीचा घामेजलेला आणि भितीने पांढराफटक पडलेला चेहरा बघुन आकाश म्हणाला, “काय गं? काय झालं???” शाल्मलीने स्वयंपाकघरात घडलेला किस्सा आकाशला ऐकवला. “च्यायला, त्या म्हातार्याच्या..”, असं म्हणुन आकाश तावातावाने उठला.. “च्चं.. जाउ देत ना अक्की.. त्यांना वाटलं ते त्यांनी सांगीतलं, विश्वास ठेवायचा की नाही ते आपण ठरवायचं ना?”, शाल्मली. “अगं हो.. पण त्याला काय वाटतं ते त्याने स्वतःशीच ठेवावं ना.. आपल्याला कश्याला ऐकवतो आहे?”, आकाश.. “जाऊ देत.. तु नको तुझा मुड खराब करु….”, असं म्हणुन शाल्मली त्याच्या शेजारी येऊन बसली… “..चल आपण सामान अनपॅक करु आणि थोडं फ्रेश होऊ ओके??” आकाशने मान हलवुन संमती दर्शवली आणि दोघंही सामानाची आवरा-आवर करायला उठले. आकाश वॉश घेऊन, आवरुन पुन्हा दिवाणखान्यात आला तेंव्हा सुर्य अस्ताला जाऊन बराच वेळ झाला होता. दाट झाडीमुळे उरला सुरला उजेडसुध्दा नाहीसा झाला होता आणि मिट्ट काळोख पसरला होता. शाल्मली खिडकीचा पडदा सरकवुन बर्याच वेळ बाहेर बघत बसली होती.. “शाल्मली??”, आकाशने हाक मारली तशी ती एकदम दचकुन जागी झाली. “काय गं? आता काय झालं दचकायला? का तो म्हातारा पुन्हा काही बोलुन गेला?”, शर्टाच्या बाह्या फोल्ड करत आकाश म्हणाला.. “नाही .. काही नाही…”, शाल्मली आपली भिती दाबत म्हणाली.. “अगं काय झालं? सांगशील का जरा???”, आकाश वैतागुन म्हणाला.. “अरे.. मला असं.. म्हणजे.. बाहेरुन कसलातरी आवाज येत होता, म्हणुन बघत होते बाहेर..”, शाल्मली “कसला आवाज?”, आकाश.. “पालापाचोळ्याचा.. काहीतरी.. म्हणजे.. कुणीतरी घसटत घसटत चालण्याचा..”, शाल्मली.. “इथे?? इथे कोण येणार आहे चालत चालत?”, आकाश जागेवरुन उठत म्हणाला… “कुठे चालला आहेस??”, शाल्मलीने परत घाबरुन विचारले.. “बघतो बाहेर कोण आले आहे… उगाच तुझी भिती आहे ती तरी जाईल ना…”, असं म्हणुन आकाशने दार उघडले त्याचबरोबर अतीथंड हवेचा एक मोठ्ठा झोत आतमध्ये आला. आकाशसुध्दा क्षणभर दचकला आणि मग म्हणाला…”बघ.. तुच बघ.. कोणीसुध्दा नाही बाहेर.. अगं वार्याने झाडं पानं हलत असतील त्याचा आवाज ऐकला असशील तु…” आणि त्याने दार लावुन घेतले. “चला.. जेवायला वाढले आहे…”, रामुकाका स्वयंपाकघरातुन बाहेर आले होते आणि व्हरांड्यातुनच त्यांनी बाहेर आवाज दिला. लगोलग आकाश, शाल्मली आणि मोहीत स्वयंपाकघरात पळाले. साधारणपणे ३ तासांनंतर सर्वजण आप- आपल्या पांघरुणात गुरगुटुन झोपले होते. घड्याळात साधारणपणे १२-१२.३० वाजुन गेले असतील. पालीच्या सतत चुकचुकण्याने आकाशची झोप चाळवली गेली. शेवटी वैतागुन त्याने डोळे उघडले. समोरच्या खिडकीतुन चंद्राचा मंद प्रकाश खोलीत येउन स्थिरावला होता. खिडक्यांचे पडदे चंद्राच्या प्रकाशाने उजळुन निघाले होते. त्या प्रकाशात आकाशला एक आकृती त्याच्याकडे रोखुन पहाताना दिसली. कोण होती ती आकृती? इतक्या रात्री आकाशच्या बेडरुममध्ये ती काय करत होती? आकाशने शेजारी बघीतले, शाल्मली जागेवर नव्हती. आकाश दचकुन उठुन बसला आणि त्याने निरखुन त्या आकृतीच्या चेहर्याकडे बघीतले. to be continued....
Posted on: Sat, 03 Aug 2013 17:38:31 +0000

Trending Topics



Recently Viewed Topics




© 2015