Yes, according to my very little understanding - he faulted many - TopicsExpress



          

Yes, according to my very little understanding - he faulted many times. At times taken strange decisions. May be he was this, he was that. As all people had some done little bit wrong amid much good, so did he. But whatever he was and he did, he still stand tall among the greats in history. He gave a thought on nearly all walks of life and shows great devotion towards the religions of new world - Truth and Humanity. he is a thought process and where-ever you go , you cannot ignore him . especially when you are searching yourself. I pay respect to M.K.Gandhi for all those deeds which empowered the people, transformed life and inspired numerous all around the globe. Freedom , got from non-violence , lives a very long life. Not to get influenced , but to get inspired by the values in him and incorporate those values in our is the need of the hour. people dont need preachers, we need common men and women who actually live the life as they preach. Happy Gandhi Jayanti and Happy Lal bahadur Shastri jayanti. A small article about gandhi:- गांधीजी भेटत गेलेले -अनिल अवचट महात्मा गांधींकडे हे शहाणपण, वेगळेपण उपजत होतं का? की कुठला तरी साक्षात्काराचा क्षण होता? त्यांना सत्याग्रह हे तंत्र नेमकं सापडलं तरी कधी? ते नुसते गांधी नव्हते, तर भारतातल्या गरीब माणसाचं प्रतीक होते. ते सतत काही शोधत होते. या देशाला परवडेल अशा जीवनपद्धतीचा शोध घेत होते. ती आधी स्वत: जगून पाहत होते. परवाही पर्यावरणवादी चळवळीत ओढला गेलेला एक तरुण पोरगा म्हणाला, काही म्हणा, ‘तो म्हातारा म्हणत होता, ते बरोबर होतं.’ मी विचारलं, ‘कोण म्हातारा?’ तो हसला व म्हणाला, ‘गांधीजी.’ मी थक्क झालो. तो ‘म्हातारा’ म्हणाला म्हणून नव्हे; तर त्याला गांधीजी जवळचे वाटतात, बरोबर वाटतात, म्हणून. ही काय जादू आहे? कुठेही जा; जागतिकीकरणाचा विषय असो, शेतीचा, पाण्याचा, बाजाराचा… अगदी नद्यांच्या प्रदूषणाचा; त्या त्या ठिकाणचे कार्यकर्ते चर्चा करून संपवताना म्हणताना ऐकतो की, कधी नव्हेत इतके गांधीजी आज रेलेव्हंट ठरले आहेत. या समस्यांचा विचार करताना त्यांनी काय म्हटले आहे, हे पाहूनच पुढे जावं लागते एकीकडे गांधींचा खून करणाऱ्यावर नाटकं येताहेत, काहीजण तर फाळणीचा दोष गांधीजींवरच ठेवताहेत. पाकिस्तानला पंचावन्न कोटी गांधीजींनी द्यायला लावले, हा त्यांचा गुन्हा मानतात. फाळणीच्या काळात माझ्या मामाने सांगितलेली हकिगत अशी, की एक माणूस त्याला म्हणाला, ‘गांधी कुठे आहे, बघायचेय?’ असं म्हणून त्यानं चपलेवरचा पाय उचलला, तर चपलेवर बरोबर टाचेखाली गांधीजींचा पेपरमध्ये आलेला फोटो फाडून चिकटवलेला. एका नि:शस्त्र माणसावर एवढे का चिडत होते हे लोक? त्यांचा जनमानसावरचा असलेला प्रभाव म्हणून? मग तो का होता, आणि आपल्याला का ते साधले नाही, असा विचार न करता ऐंशी वर्षांच्या नि:शस्त्र म्हाताऱ्यावर कुणी गोळी झाडावी? माझा एक तरुण मित्र सांगत होता, त्याचे कॉलेजातले मित्र तर गांधींचा उल्लेख बुढ्ढा, टकल्या असा करतात. कोणी त्यांना हे शिकवलं? काहीजणांनी गांधीजींच्या मुलाची व्यथा मांडली आहे. त्यांनी मुलांना नीट वागवले नाही, त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं, इत्यादी. ते खरंच आहे. पण हे अनेक महापुरुषांबाबत झालेलं दिसतं. सर्व माणसं सर्वच बाबतीत बरोबर किंवा यशस्वी असतात, असं नसतं. गांधीजींचं चुकलं असणं शक्य आहे. त्यांनी स्वत:च आपल्या हिमालयाएवढ्या चुका झाल्याचं लिहिलं आहे. त्यांच्या दीर्घ आयुष्यात सगळंच बरोबर, योग्य असंच ते वागले, हे शक्य नाही. **** अठ्ठेचाळीस साली मी चार वर्षांचा होतो. गांधीवधानंतर उसळलेल्या दंगलीची थोडीफार आठवण आहे. माझे वडील त्यांचेच डॉक्टर. पण जमावाने आमचा दवाखाना फोडून उद्ध्वस्त केला. सकाळी मी घाबरत जरा जवळ गेलो, तर रस्त्याभर केसपेपर्स. रस्ता पांढराच दिसला. त्या काळात आम्ही कोणी घराबाहेर पडत नव्हतो. घरात सर्व घाबरलेलं वातावरण. कुणी कुणाशी बोलत नव्हतं. तो भीतीदायक सुन्नपणा मला अजूनही आठवतोय. नंतर जरा वाढत्या वयात कळलं, की वडिलांना ठार मारायला लोक त्यांना शोधत होते. राजाराम पाटील आणि भगवंता पाटील या वडिलांच्या मित्रांनी त्यांना लपवलं, म्हणून ते वाचले. नाहीतर आमचं-माझं-काय झालं असतं, कोण जाणे. पुढं वातावरण निवळलं. गांधीजी दूरचे वाटत. त्यांची अहिंसा बावळटपणा वाटे. सावरकरांची ‘माझी जन्मठेप’ वाचलं. क्रांतिकारकांची चरित्रं वाचल्यावर तर हे मत पक्कं होत होतं. खेड्यातनं शहरात आल्यावर ब्राह्माण असण्याचं एकाकीपण संपलं होतं. सर्व थरांतल्या पोरांच्या दोस्त्या होत होत्या. या सगळ्यात कुठं तरी गांधीजी भेटले असावेत. मेडिकलला आम्ही अभ्यास मंडळ काढायचं ठरवलं. लाजिरवाण्या परिस्थितीतल्या आपल्या देशाला जगात ताठ मानेनं कसं जगता येईल, यावर तावातावाने विचार करायचो. देश म्हणजे नुसता नकाशा किंवा जमिनीचा तुकडा नव्हे; तर तिथं राहणारा समाज, तिथली गरीब माणसं… या समीकरणापर्यंत आलो, म्हणून बचावलो. नाही तर आम्ही ‘जाज्वल्य राष्ट्रप्रेमी’ झालो असतो. आणि समाज बघायचा राहिलाच असता, आणि गरिबांचं खरंखुरं जीवन, त्यांचे प्रश्न तर या जन्मात दिसले नसते. **** आमचं वर्ध्याला शिबीर होतं. इथं काही गांधीवादी लोकांची ओळख झाली. त्यातले एक आठवताहेत, ते अण्णासाहेब सहसबुद्धे. हिरवट घारे डोळे, टक्कल, सरळ नाक. शेती हा त्यांचा खास विषय. आम्ही त्यांच्याशी वाद घालत होतो, ‘सशस्त्र क्रांती झाली पाहिजे, त्याशिवाय हे प्रश्न् सुटणार नाहीत.’ ते चिडून निघून जातील असं वाटलं होतं. उलट हसून ते म्हणाले, ‘बरोबर आहे. आपण सशस्त्र क्रांती करायला माझी काही हरकत नाही. किती लोक त्याच्यासाठी तयार आहेत? किती लोक तुमच्या मागे येतील? सरकार उलथवायचे झाले, तर सैन्याचा मुकाबला कसा करणार? असं समजू की तेही आपण करू शकलो, तरी भारतातल्या लाखो गावांमध्ये जाऊन शेतीसुधारणा, जातिभेद निर्मूलन, अंधशद्धा निर्मूलन हे करायला किती कार्यकर्ते लागतील? ते कोण तयार करणार. समजा तेही झालं आणि शेतकरी या बदलांना तयार नाही झाले, तर काय? की त्यांनाही गोळ्या घालायच्या? असे किती लोकांना गोळ्या घालणार? या सगळ्यांनी आपल्याविरुद्ध उठाव केला तर?…’ बाप रे… आम्ही हा विचारच केला नव्हता. सर्व प्रष्‍नानंची उत्तरं सशस्त्र क्रांतीतून मिळतील, असं समजत होतो; पण अण्णासाहेबांनी तो विचार फक्त शेवटपर्यंत नेऊन दाखवला आणि माझे डोळेच उघडले. मग त्यांचं म्हणणं मी लक्ष देऊन ऐकू लागलो. वर्धा शिबिराच्या निमित्ताने पवनारला विनोबांच्या आश्रमाला आम्ही पाचएकशे तरुणांनी भेट दिली. विनोबांविषयीही मनात अढी. कधी थट्टाही करायचो. आम्ही आश्रमात गेलो तेव्हा कळलं की, ‘ते मौनात आहेत. तुम्ही प्रश्‍न विचारा, ते पाटीवर लिहून उत्तरे देतील.’ काय बोअर प्रकार हा, असं म्हणत एका मंडपात रांग करून बसलो. हिरवी कानटोपी, पुढे थोडे हूड असलेली घालून ते आले आणि आमच्या प्रश्‍नोत्तराच्या सुरुवातीलाच त्यांनी मौन सोडून उत्तरं द्यायला सुरुवात केली. तासभर ते बोलले. मला सगळ्यात आवडली, ती त्यांची प्रसन्न सुंदर भाषा! असं सहज आणि सुंदर मराठी त्यापूर्वी ऐकलं नव्हतं. त्यांचे युक्तिवादही त्या वेळी स्फुरलेले, चपखल होते. शहरं खेड्यांचं कसं शोषण करतात, हे सांगताना म्हणाले, ‘शहरट लोक असतात ना, त्यांना सगळीकडचं उत्तम ते हवं असतं. तसे ते हावरटच,’ असं म्हणून छान, लहान मुलासारखे हसले. पुढे म्हणाले, ‘कृष्ण गवळणींना उगाच अडवीत होता का?’ मी चक्रावलोच. ‘ या शहरट लोकांना खेड्यातलं सगळं हवं असतं. दूध होतं खेड्यात, पण खेड्यातल्या लोकांना प्यायला मिळत नाही. म्हणून कृष्णानं शहराकडे दूध विकायला निघालेल्या गौळणींना अडवलं…’ ही त्यांची संगती अजब होती, पण हळूहळू पटतही होती! नंतर ‘ती’ गांधीजींची झोपडी बघायला गेलो. मला ती बाहेरूनपेक्षा आतूनच आठवतेय. कुडाच्या भिंती मातीनं सारवलेल्या. जमिनी शेणात सारवलेल्या. त्यांच्या बसायच्या खोलीत अंधार-प्रकाशाचा छान मेळ होता. म्हटलं तर अंधार, पण अप्रत्यक्ष प्रकाशही. या माणसाला या बाबतीतली एवढी प्रगल्भ दृष्टी होती? पुढे काही वर्षांनी लॉरी बेकरविषयी पुस्तक वाचलं. हा सैनिक. स्वातंत्र्यपूर्व काळात ब्रह्मादेशच्या लढाईवरून घरी इंग्लंडला परत चालला होता. त्यानं पेपरमध्ये गांधींविषयी खूप वाचलं होतं. ‘हा कोण माणूस, बघून तरी जाऊ या’ असं म्हणून गांधीजींना भेटायला गेला. गांधीजींनी त्याला विचारलं, ‘इंग्लंडला जाऊन काय करणार?’ ‘ मी आर्किर्टेक्ट आहे. तो व्यवसाय करीन.’ गांधीजी म्हणाले, ‘मी खरा आर्किर्टेक्ट कोणाला म्हणतो, माहीत आहे? जो 25 मैलाच्या परिघातून बांधकाम साहित्य मिळवतो तो.’ लॉरी बेकर चक्रावलाच. तो इंग्लंडला गेला. प्रॉपर्टी विकून भारतात परत आला. केरळमध्ये स्थायिक झाला आणि गांधीजींच्या व्याख्येप्रमाणे विटांचा जास्तीत जास्त वापर करून हवेशीर, सुंदर घरं बांधली. त्याला ‘ब्रिक मॅन ऑफ इंडिया’ असं संबोधतात. गांधीजींच्या एकेका वाक्याने अनेकांनी त्यांची त्यांची आधीची जीवनं फेकून देऊन पूर्णपणं वेगळा रस्ता धरला आहे. कसा होत असेल हा बदल? त्यांच्या करिष्म्यामुळे का? मला वाटतं, त्यांच्या अल्पाक्षरी, पण जगावेगळ्या दृष्टिकोनामुळं असेल. अभय बंग एक मोतीलाल नेहरूंची गोष्ट सांगतो. ते बडे वकील, अमीर. गांधीजींनी जाहीर केलेला दांडीचा मिठाचा सत्याग्रह त्यांना हास्यास्पद वाटला. एवढं मोठं ब्रिटिश साम्राज्य. या मूठभर मीठ करण्यानं त्यांच्यात काय फरक पडणार? त्यांनी गांधीजींना या व्यर्थपणाविषयी लांबलचक पत्र लिहिलं. गांधीजींची तार आली, ‘करके देखो.’ त्या दिवशी अलाहाबादमध्ये या सत्याग्रहाला पाठिंबा देणारी सभा होती. ‘म्हातारा म्हणतोय तर जाऊ सभेला.’ तसं जाहीर होताच सभेला जाण्यापूवीर्च त्यांना अटक करण्यात आली. त्यांनी पोलिसांना विनंती करून गांधीजींना तार केली. ‘करनेसे पहलेही देख लिया.’ जवाहरलाल, वल्लभभाई आणि कितीक गांधीजींच्या एका भेटीत पूर्ण बदलून गेल्याची उदाहरणं आहेत. काय होतं त्यांच्यात? काटकुळा, उघडा कृश देह, पडक्या दातांचं हास्य. पडके दात वार्धक्यामुळे पडले नव्हते, तर दक्षिण आफ्रिकेत गोऱ्यांविरुद्ध लढा उभारला असताना एका गोऱ्या आणि एका पठाण तरुणाकडून बेदम मारहाणीत पाडले गेले होते. नंतर हे दृश्य पाहणाऱ्या एका गोऱ्या महिलेनं त्यांना हॉस्पिटलात दाखल केलं. तिथे हिंदी समाजाचे लोक जमले. त्या तरुणांवर पोलिस कंप्लेट करूयात, त्यांना जास्तीत जास्त शिक्षा झाली पाहिजे, असं लोक म्हणू लागताच त्याही अवस्थेत गांधीजी म्हणाले, ‘चळवळ करताना वैयक्तिक त्रास होतो. त्याबद्दल मी तक्रार करणार नाही. चळवळीत सर्वांवर होणाऱ्या अत्याचाराची आपण जरूर दाद मागू’ म्हणून पोलिस तक्रार केली नाही. नाहीतर त्या मुलांना नक्कीच शिक्षा होऊ शकली असती. गांधीजींचं हे वेगळेपण. नंतर त्या मुलांनी येऊन गांधीजींकडे क्षमायाचना केली. गांधीजींकडं हे शहाणपण, वेगळेपण उपजत होतं का? की कुठला तरी साक्षात्काराचा क्षण होता? त्यांना सत्याग्रह हे तंत्र कधी सापडलं? गांधीजींचं तंत्र घडलं ते दक्षिण आफ्रिकेत. माझी समजूत ते तिथं दोन/चार वर्षं असतील एकूण. पण तिथं ते 21 वर्षं होते. तिथं ज्या खटल्यात त्यांना तिथल्या वकिलाच्या मदतीला पाठवलं होतं, तिथं दुसऱ्या पाटीर्ला भेटून त्यांनी कोर्टाबाहेर तडजोड घडवून आणली. जी बाजू सत्य असेल, त्यांचेच वकीलपत्र घेत. त्यामुळे कमाई कमी. म्हणून गरजा कमी केल्या. जाती-धर्मांमध्ये विखुरलेल्या हिंदी समाजाला एकत्र आणून लढा उभारला. पण असं त्यांना करावंसं नेमकं कधी वाटलं? दोन घटना फार हृद्य आहेत. नाताळला तिकीट असतानाही गोऱ्यांनी त्यांना र्फस्ट क्लासमधून प्लॅटफॉर्मवर सामानासहित फेकून दिलं. ही घटना खूप आधीपासून माहीत होती; पण पुढचं वाचलं तेव्हा निराळा बोध झाला. रात्रीच्या वेळी, कडाक्याच्या थंडीत तिथल्या वेटिंग रूममध्ये गांधीजी रात्रभर बसून राहिले. जवळचं सामान उघडून स्वेटर, शाल, पांघरूण काढता येणं शक्य होतं; पण तसं केलं नाही. रात्रभर काय विचार केला असेल त्यांनी? कदाचित इथे अन्यायाचा प्रतिकार करण्याचा निश्चय झाला असेल. कदाचित सत्याग्रह ही कल्पनाही सुचली असेल; पण त्या रात्रीनंतर ते आमूलाग्र बदलले, हे साऱ्यांच्याच लक्षात आलं. दुसरी घटना त्यानंतरची. घोडागाडीत-व्हिक्टोरियात बसले असताना गोरा सोजिर आला. त्यानं, मला आत बसू दे, तू घोडागाडी चालवणाऱ्या कोचमनच्या शेजारी बस, असं सांगितलं. ते गांधींनी मान्य केलं. तसं पुढं जाऊन बसलेही. काही वेळानं गोऱ्याला कोचमनशेजारी बसून सिगरेट पिण्याची लहर आली. तो परत गांधींना उठायला सांगू लागला. गांधींनी त्याला नकार दिला. त्यानं आणि कोचमननं गांधीजींना बडव बडव बडवलं. गांधीजींनी बाजूची पितळी दांडी घट्ट धरून ठेवली, ती सोडली नाही. शेवटी त्या दोघांनी तो नाद सोडून दिला. ती पकडलेली दांडी, हा सत्याग्रहाचा जन्म असावा. मी प्रतिकार करणार नाही, पण दांडीही सोडणार नाही. सविनय कायदेभंगाच्या या तंत्रापुढं नंतर ब्रिटिश साम्राज्यही डळमळलं, एवढी या साध्या सोप्या तंत्रात ताकद होती. हे तंत्र गांधीजींनी ‘थोरो’कडून घेतलं का? थोरो हा एक पिढी आधीचा. थोरोच्या मृत्यूनंतर गांधीजींचा जन्म झालाय. अमेरिकेतला तत्त्वज्ञ हेन्री डेविड थोरो याचं वॉल्डन (मराठीत दुर्गा भागवतांनी भाषांतर केलेलं ‘वॉल्डनकाठी विचार विहार’) हे पुस्तक वाचल्यावर मी कॉलेजात असताना झपाटून गेलो होतो. शहरातील कृत्रिमतेला कंटाळून तो वॉल्डन तळ्याकाठी राहू लागला. स्वत:च्या हातानं झोपडी बनवली. तो लिहितो, ‘आपण आपलं घर बनवायचा आनंद सुताराला का देतो, हे कळत नाही.’ (खरं तर त्यालाही तो मिळत नाही) आसपासच्या जमिनीत धान्य उधळून, खतपाणी, मशागत न करता येईल त्या धान्यावर, फळांवर गुजराण करू लागला. त्याचे निबंध वाचण्यासारखे आहेत. जॉन रस्किनच्या ‘अनटू दि लास्ट’ या पुस्तकाप्रमाणंच थोरोविषयी त्यांनी वाचलं होतं का? माहीत नाही; पण शक्य आहे. गांधीजींच्या साध्या राहणीची सुरुवात आफ्रिकेत झाली. ती पुढं त्यांनी आणखीनच साधी केली. ओरिसात एक दरिदी स्त्री पाहिली. तिच्यापाशी एकच पातळ विरलेलं वस्त्र होतं. त्यामुळं ती परत परत तेच घालत असे. हे पाहून गांधीजींचे मन कळवळले. त्यांनी टोपी आणि अंगरख्याचा त्याग केला आणि पंचावर राहू लागले. मग ते कुठेही असोत; कोणाला, अगदी व्हॉइसरॉयला भेटायला जायचे असो. ते नुसते गांधी नव्हते, तर भारतातल्या गरीब माणसाचं प्रतीक होते. ते सतत काही शोधत होते. या देशाला परवडेल अशा जीवनपद्धतीचा शोध घेत होते. ती आधी स्वत: जगून पाहत होते. गांधीजींच्या चळवळीत खूप माणसे घडली. काही स्वातंत्र्य चळवळीत होती, काही विधायक, तर काही दोन्हीतही. गांधीजींनी कुणाला गोशाळा काढायला सांगितलं, तर कुणाला निसगोर्पचार आश्रम; कुणाला शौचालयावर संशोधन, तर आणखी कुणाला आणखी काही आणि ही माणसं बिनतक्रार आयुष्यभर त्या कामात राहिली. त्या माणसांचीही आपापली वैशिष्ट्ये सांभाळून. कुडाळचे अप्पा पटवर्धन हे असेच विलक्षण व्यक्तित्व. त्यांचं ‘माझी जीवनयात्रा’ हे आत्मचरित्र वाचलं आणि चकित झालो. तुरुंगात त्यांनी भंगीकाम पाहिलं. स्वत: करायची तयारी दाखवली; पण तुरुंगाधिकाऱ्यानं परवानगी दिली नाही. कुडाळमध्ये परत आल्यावर बादली- खराटा घेऊन सक्काळी भंग्यांमध्ये (आता आपण त्यांना मेहतर म्हणतो) मिसळले. पुढं त्यांनी अनेक प्रयोग केले. चराचे संडास, सोपा संडास… इ. आज बिंदेश्वरी पाठकांनी भारतभर बांधलेली सुलभ शौचालये हा अप्पांचा सोपा संडासचीच जवळची आवृत्ती. नाशिकजवळ गंगापूरला भाऊ नावरेकरांनी हेच काम पुढं चालू ठेवलं. आता त्यांची मुलं काम करीत आहेत. त्यांनी बायोगॅसचा सुटसुटीत प्लँट तयार केला आहे आणि जागोजाग जाऊन तो ते करून देतात. तोडणकर गुरुजीही असेच संडास या समस्येला वाहिलेले. संडास ही काय प्रतिष्ठितपणं उच्चारायची गोष्ट झाली? त्याकडं डोळेझाक करीतच आपण ती समस्या आणखी वाढवून ठेवली आहे. खेड्यापाड्यात स्त्रियांनी पहाटे किंवा रात्री उशिरा गटानं जाऊन बाहेर रस्त्याकडेला बसावं आणि गाडीचा प्रकाश पडला की उभं रहावं… किती लाजिरवाणी अवस्था. शेतं गावाला खेटायला आली आणि अशा जागा नष्ट झाल्या. शहरात त्यापेक्षा वाईट अवस्था. मागे पंचगंगा या कोल्हापूरच्या नदीची पाहणी केली होती. गावातलं बहुतेक सर्व ड्रेनेज कुठल्याही प्रक्रियेशिवाय पंचगंगेत सोडलेलं. पुढची गावं तेच पाणी पितात. आज बहुतेक सगळ्या नद्यांची गटारं करून टाकलीत आम्ही. मैला हे उत्तम खत देतं, स्वयंपाकाला इंधन देतं. ते न घेता त्याची महाभयानक समस्या करून बसलोय. गांधींची थट्टा करू शकता; पण मग या समस्याही सोडवून दाखवाव्यात. गांधी परंपरेतला फसलेला प्रयोग म्हणजे भूदान, असं मी समजायचो. विनोबांची यात्रा पुढं गेली की, दान केलेली जमीन मालक परत घ्यायचे… वगैरे. पुण्याला धनंजयराव गाडगीळांचे भाषण होते. ते मार्क्स प्रवाहातले अर्थशास्त्रज्ञ समजले जात. ते केंद सरकारत प्लॅनिंग कमिशनचे अध्यक्षही होते. ते म्हणाले, ‘भारतातल्या समस्या सोडवण्यासाठी आपण जगाकडं पाहतो. साम्यवाद, समाजवाद असे काही मार्ग आहेत. भारतीय परिस्थितीवर भारतातून निघालेले एकमेव उत्तर म्हणजे भूदान चळवळ होय. ती भले अशयस्वी ठरेना का; पण जगाला आथिर्क प्रश्‍नांवरचा भारतातून पुढं आलेला हा एकमेव उपाय आहे.’ तेव्हा मी चमकलोच होतो. मी साधनेचा संपादक असताना स्वातंत्र्य मिळून 25 वर्षं पूर्ण झाली होती. सगळीकडे 25 वर्षांत आम्ही काय मिळवलं, तर भाक्रानान्गलसारखी धरणं, भिलाई वगैरे कारखाने असे फोटो येत. गांधीजींचं एक वाक्य मी वाचलं होतं, ‘देशाच्या प्रगतीचा निकष एकच, की ती प्रगती शेवटच्या माणसापर्यंत पोहोचली आहे की नाही, हा!’ त्याला ते अंत्योदय म्हणत. म्हणून मी तो विशेषांक दलितांनीच लिहावा, त्यांना या देशाविषयी काय वाटतं हे त्यांनी निर्भयपणं लिहावं, असं आवाहन करून तो अंक छापला; पण ते कटू सत्य कित्येकांना पचलं नाही आणि गदारोळ झाला. अंकाचं दहन झालं. माझी आणि यदुनाथजींची प्रेतयात्रा काढून त्याचंही दहन झालं. (माझ्या प्रेतयात्रेबरोबर मीही चालत होतो!) आज वरच्या वर्गाची, उच्च मध्यमवर्गाची स्थिती सुधारतेय. त्यांच्या आकर्षक कॉलनीज्, त्यांच्यासाठी उत्तम शाळा, भव्य हॉटेल-रेस्टारंट्स उभी रहात आहेत. त्याला आम्ही प्रगती समजतोय; पण खाली गाडली गेलेली, चेपली गेलेली माणसं? कर्जबाजारी शेतकऱ्यांचे गळफास! आपण खालच्या माणसापासून सुरुवात केली असती, तर एवढी झकपक नसती दिसली; पण माणसं चार घास सुखानं खाऊ शकली असती. गांधीजींचा आधुनिकतेला विरोध नव्हता; पण माणसांना सुखी करणारा समाज महत्त्वाचा. त्याला अनुरूप आधुनिकता त्यांना मान्य होती. आजची कामगारविरहित कारखानदारी त्यांनी कधीच मान्य केली नसती. शूमाखरचं ‘स्मॉल इज ब्युटीफूल’ इथं आठवलं. गांधीजींचा अवाढव्यतेला विरोध होता; कारण त्याखाली सर्वसामान्य माणसं चिरडून जातात म्हणून. गांधीजींचा प्रभाव जगावर होता, हे 2000 साली ‘मिलिनियम’वर प्रभाव टाकणाऱ्या व्यक्तीची निवड सुरू झाल्यावर कळलं. लेखक, नेते, शास्त्रज्ञ, कलावंत सगळी नावं मागं पडली, आणि दोन उरली. एक आइनस्टाईन आणि दुसरे गांधीजी. त्यात आइनस्टाईनला जास्त मतं पडली आणि ते सर्वात प्रभाव पाडणारी व्यक्ती ठरले. पण गांधीहत्या झाल्यावर आइनस्टाईन काय म्हणाला होता, माहीत आहे? तो म्हणाला की, ‘गांधींसारखी महान व्यक्ती कधी काळी जन्मली होती आणि या भूतलावर चालली होती, हे पुढच्या पिढ्यांना खरं वाटणार नाही.’ (लॉर्ड माऊंटबॅटन हे शेवटचे व्हाइसरॉय आणि ब्रिटिश राजघराण्यातील. त्यांनी म्हटलं आहे, ‘इतिहासाच्या पानावर गांधीजींचं नाव ख्रिस्त आणि बुद्ध यांच्या बरोबरीनं लिहिलं जाईल.) माटिर्न ल्यूथर किंग या कृष्णवणिर्यांच्या नेत्याचं चरित्र वाचताना त्यानं गांधीजींविषयी जागोजाग कृतज्ञता व्यक्त केल्याचं दिसलं. पुस्तकाच्या फोटो विभागात त्याच्या खोलीत त्याच्या मागे गांधीजींचा फोटो लावलेला होता. अमेरिकेसारख्या पिस्तुलगच्च देशात, त्यातही कृष्णवणीर्य समाजात अहिंसक चळवळ रुजवण्याचं काम तो करू शकला, हे गांधी-विचाराचं यश. कॅलिफोनिर्यामध्ये असलेल्या मेक्सिकन मजुरांचा नेता सीझर शॅवेझ असाच. अहिंसक चळवळी तर करायचाच; पण प्रश्‍न तडीला लावण्यासाठी गांधीजींसारखी वीस-वीस दिवसांची उपोषणे करायचा. त्याच्याही खोलीत गांधीजींचा फोटो. माटिर्न ल्यूथर किंग आणि सीझर शॅवेझ यांचा प्रभाव इतर हिंसक चळवळींपेक्षा जास्त टिकून राहिलाय आणि त्यांनी मनं जोडण्याचं अपूर्व काम केलंय. मधू लिमयांबरोबर उत्तर प्रदेशात प्रवास करताना त्यांच्याशी खूप गप्पा व्हायच्या. गांधीहत्या झाली, तेव्हा ते दूर युरोपातल्या कुठल्या छोट्या देशात होते. रेडिओवर ही बातमी ऐकून विमनस्क होऊन रस्तोरस्ती भटकत होते. एका प्रौढ माणसानं त्यांना थांबवलं. विचारलं, ‘तुम्ही भारतीय का?’ हे ‘हो’ म्हणताच त्या गृहस्थांनी यांचे खांदे गदा गदा हवलत म्हटलं, ‘व्हाय डिड यू किल् गांधी? तुम्ही काय समजता, गांधी काय फक्त तुमचेच होते?’ हे ऐकून मी शहारलोच. त्या जगाच्या पाठीवरच्या कुठल्या देशातल्या माणसाला गांधीजी ‘त्याचे’ वाटावेत आणि आम्ही त्यांना ओळखू नये? आणखी एका गोष्टीचं मला प्रचंड आश्चर्य वाटतं. इतक्या वर्षांच्या अविश्रांत लढ्यानंतर, अनेकदा भोगलेल्या तुरुंगवासानंतर स्वराज्य मिळालं. अशा कार्यक्रमाचे नायक कोण असायला हवे होते? तर गांधीजी; पण त्यांना नोआखालीत उसळलेल्या दंगली शांत करण्याचं काम महत्त्वाचं वाटलं आणि या सोनेरी क्षणाकडं त्यांनी पाठ फिरवली. आज काहीजण फाळणीला गांधीजींना जबाबदार धरतात. हेही जगातलं महान आश्चर्यच मानायला हवं. त्यांनी फाळणी होऊ नये, म्हणून जिवाचं रान केलं; पण शेवटी त्यांच्या शिष्यांनी- पंडित नेहरू आणि लोहपुरुष वल्लभभाई पटेलांनी- गांधीजींना बाजूला सारून फाळणी मान्य केली. पंचावन्न कोटींबाबतही तसेच. त्या करारात भारताने ते द्यायचे मान्य केले होते. तर ते वचन आहे, आणि ते पाळा, असे गांधींनी म्हटले; तर ते फाळणीचे गुन्हेगार ठरतात! दंगलीचे डोंब उसळलेले असताना, सर्वत्र लाल कारंजी उडत असताना गांधीजी एकटेच असे की जे तिथे जाऊ शकले आणि त्यांचे आतले बळही असे, की त्यांच्या अस्तित्वाने दोन-तीन दिवसांत दंगल शांत झाली. ज्यावेळी त्यांचे शिष्य स्वराज्यातले पहिले झेंडावंदन करीत होते, त्यावेळी गांधीजी सामान्यांचे अश्रू पुसत होते. त्यांना स्वराज्यापेक्षाही माणुसकीचा धर्म मोठा वाटत होता. माझ्यावर गांधीजींचे वेगळेच उपकार आहेत. त्यांची ‘आत्मकथा’ वाचताना लहानपणी त्यांनी सोन्याच्या कड्याचा तुकडा चोरून विकला होता. बाहेर मांसाहारही केला होता. मीही लहानपणी घरातल्या कपाटाल्या काही नाण्यांच्या चोऱ्या केल्या आहेत. त्याची खंत अजूनही वाटत असते. त्यातून सिगारेट ओढायला शिकलो. पुढं ते सगळं वाहून गेलं, म्हणून योगायोगाने वाचलो. गांधीजींना चोरी केल्याचा पश्चाताप झाला आणि स्वत: होऊन वडलांपाशी जाऊन गुन्हा कबूल केला तो यांच्या आणि वडलांच्या अश्रूत वाहून गेला. हे वाचून मी शहारलो. गांधी आपल्यासारखेच चुका करणारे होते; पण मग ते ‘गांधीजी’ कसे झाले? तर स्वत:मधल्या चुकांकडे स्वत:च परखडपणे पाहाणं, आणि दुरुस्त करायचा प्रयत्न करणं, ही स्वत:स सतत शुद्ध ठेवण्याची प्रक्रिया त्यांनी लहानपणापासून चालू ठेवली. म्हणून ते विश्वव्यापी झाले. आपण तसे करू या का? त्या काळात मी धामिर्क मार्गात होतो. ध्यान करायचो. निविर्चार होण्याची वाट पाहण्यापेक्षा मी दिवस समोर आणू लागलो. मला काही गांधीजी व्हायचे नव्हते. फक्त कालच्यापेक्षा आज चांगला माणूस व्हायचं होतं. हे जेव्हा सुरू केलं, तेव्हा लक्षात आलं, की आपण दिवसाकाठी बऱ्याच चुका करतोय. माझ्यामधल्या अहंकाराचं तर कधी कावेबाजपणाचं, कधी उथळपणाचं, तर कधी इतरांवर इंप्रेशन मारणाऱ्या स्वभावाचं दर्शन होऊ लागलं. ज्या व्यक्तींना माझ्याकडनं त्रास झाला असेल, तर नंतर त्याच्याकडे जाऊन कधी माफी मागू लागलो, तर कधी खंत व्यक्त करू लागलो. काही चुका परत परत होताना दिसत. त्या मी ओलांडू शकत नसे; पण त्या चुका आहेत, एवढं तरी मनाला जाणवू लागलं. या प्रक्रियेत अध्यात्म सुटलंच. काय करायचाय मोक्ष आणि जन्म-मरणाच्या फेऱ्यातून सुटका? त्यापेक्षा चांगला माणूस किंवा चांगला होऊ इच्छिणारा माणूस म्हणून जगूयात की. मग हा अनुभव मी इतरांना सांगू लागलो. यासाठी ज्ञानाची, शिक्षणाची, साधनेची काही गरज नाही. प्रत्येक माणूस हे करू शकतो. कधी ना कधी चांगल्या माणसांचा समाज निर्माण होईलही. हे गांधीजींचं माझ्यावरचं ऋण. आज ‘साधी राहणी’च्या बरोबर उलट्या दिशेने आपण चाललो आहोत. त्यातनं काय निष्पन्न होतंय? निसर्गाची भयानक लूट आणि त्यातून होणारं कायमचं नुकसान, प्रचंड कचरानिमिर्ती आणि त्यातून जीवसृष्टीला होणारा धोका, पृथ्वीचं वाढतं तापमान आणि त्यातून विरघळणारे ध्रुव आणि त्यातून पाण्याखाली जाणारी बेटं आणि बंदरं… त्यापेक्षा गांधी काय सांगत होते, ते ऐकले असते तर? खेड्यातलं अन्न, कापूस, दूध खेड्यातच वापरा. काही गरजा शेजारच्या खेड्याकडून भागवा. गाव स्वच्छ ठेवा. मैल्यातून, शेणातून खत निर्माण करा. गायी, बैल जोपासून गोधन वाढवा. सृष्टी, प्राणी यासहित चांगले जीवन जगा… यात थट्टा करण्याजोगं काय होतं? आज कोल्हापूर भागातलं दूध टँकरमधून मुंबईला पाठवण्यात सृष्टीवर किती ताण देतोय आपण? बहुसंख्य प्रश्न शहरांच्या बेसुमार वाढीमुळंच निर्माण झाले आहेत. खेडी भकास झाली. तिथले कारागीर डुबले आणि शहरात येऊन काय मिळालं? तर झोपडपट्टी, प्रदूषित जीवन. आता तर कामगारांची गरज नसलेल्या कारखान्यांमुळं बेकारीही. परत परत गांधीजी आता अधिक बरोबर ठरताहेत. या वर्षातच मला र्वध्याला जाण्याचा योग आला. तिथे जुने गांधीवादी भेटले, मी बापू-कुटीकडे निघालो. गांधीजी बसत, तिथं पुढं डेस्क आणि मागे टेकायला जरा उभा उंच पाट होता. मला खरं तर अशा गोष्टीचं फार अगत्य नाही. परदेशप्रवासात पूवीर्च्या मोठ्या लेखकांची, नेत्यांची घरं दाखवत. ते कुठं बसत, कुठं झोपत, कुठं लिहीत… असं दाखवायचे. वाटायचं, असतील; पण ते नाहीत, तर त्या वस्तूंचं काय एवढं? बाहेर व्हरांड्यात आलो. एका खांबाला टेकून बसलो. बाकीचे माझे मित्र त्या परिसरात हिंडत होते. याही कुटीत कुणी मधूनच येऊन जात होतं. मी बसलो त्या आडोशाआडच गांधीजींची ती बसायची जागा होती. पिशवीतून कार्ड काढलं, आणि त्यावर पेन्सिलनं कसलं तरी चित्र काढू लागलो. मनातलं झाड हळूहळू वर येत होतं. भोवतीचा विसर पडला. एकदम समोर लक्ष गेलं. गांधीजींची जागा दिसली. भास झाला, की गांधीजी तिथं बसले आहेत आणि हसून मला येण्याची खूण करताहेत. मला गंमत वाटली. या भासाला मी आपण होऊन चालना दिली. काय होईल पुढं? गांधीजी माझं चित्र पाहतील आणि हसतील छान. ते पडक्या दातांचं निर्मल हासू…
Posted on: Wed, 02 Oct 2013 05:06:55 +0000

Trending Topics



Recently Viewed Topics




© 2015